कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहरातील एका 10 वी च्या विद्यार्थिनीने बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जुन्या कोयना पुलावरून उडी घेतल्याची घटना घडली. पुलावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या मुलीला दोन मुलांनी धाडसाने वाचविले आहे. या मुलांच्या धाडसाचे कौतुक नागरिकांच्यातून केले जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज बुधवारी दि.16 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कराड शहरातील ब्रिटिशकालीन जुन्या पुलावरून एका अल्पवयीन मुलीने कोयना नदीपात्रात उडी घेतली. मुलीने उडी घेतल्याची घटना पुलावर असलेल्या काही नागरिकांनी पाहिली. त्यानंतर नदीत उडी घेतलेल्या मुलीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. रात्रीचे 9 वाजले असल्यामुळे अंधारात पाण्यात नक्की मुलगी कुठे आहे हे कोणालाच दिसत नव्हते.
कराड : पूलावरुन उडी घेतलेल्या मुलीला धाडसी तरुणांनी वाचवले. pic.twitter.com/kvrRzS8XHr
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) February 16, 2022
अशावेळी लोकांना काय करायचे हे समजत नसताना, तेथे दोन तरुण मुले आली. त्यांना सदरील घटना समजली. त्यांनी धाडस करून पुलावरून खाली नदीच्या काठावर जावून मुलीचा शोध लागतो, का हे पाहिले. त्यानंतर काही वेळाने पाण्यात मुलगी दिसली. तेव्हा दोन्ही मुलांनी अंधारात नदीत उडी घेतली व मुलीला नदीपात्रातून बाहेर काढले.
अंधाऱ्या रात्रीत धाडस करत दोन मुलांनी सदर मुलीचा शोध घेऊन तिला नदीपात्रातून बाहेर काढले. कराड शहरातील एकजण (नांव समजू शकले नाही) व पाटण तालुक्यातील गारवडे येथील अनिकेत शिंदे या मुलांच्या धाडसाचे उपस्थितांनी कौतुक केले. अनिकेत हा कराड शहरात कामाला असून घरी जात असताना ही घटना घडली असल्याचे त्याने सांगितले. अल्पवयीन मुलगी शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेत आहे. सध्या, या मुलीवर कराड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.