व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरूणाला गरम चुन्याच्या निवळीत ढकलले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यातील रविवार पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे. काल रात्री बुधवारी उशिरा 11.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलेल्याचे समोर आले आहे. जखमी तरूणांवर सातारा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतचा गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील रविवार पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या समाधान महादेव मोरे (वय- 29) या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे उकळत्या चुन्यात निवळीत तरूणाला ढकलून देण्यात आले. या तरूणाला नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मारहाण झालेल्या मुलाचे शरीर ठीक ठिकाणी भाजले आहे.

जखमी तरूणावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. मारहाण करणारे संशयित हे दारू पिलेले असल्याचे तक्रारदार यांचे सांगणे आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तरूण 9 टक्के भाजला असल्याची माहिती सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली. तसेच संबधित आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असेही सांगितले.