खावून खावून 50 खोके, माजलेत बोके; शंभूराज देसाईंच्या मतदार संघात शेतकर्‍यांची घोषणाबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
शिंदे गटाचे आमदार तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील मतदार संघातील तरुण शेतकऱ्यांनी शिंदे-फडणवीस सरकार विरोधात मोर्चा काढला. यावेळी “खावून खावून 50 खोके, माजलेत बोके-माजलेत बोके” अशा घोषणा आक्रमक शेतकऱ्यांनी दिल्या.

पाटण तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच सरकारकडून स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीवर अधिग्रहण करण्याची कारवाईही केली जात आहे. अशात दुसरीकडे सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत व नुकसानीबाबत भूमिका मांडणे आवश्यक असते.

मात्र, तसे होताना दिसत नसल्याने शिवाय शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी नुकसान भरपाई जाहीर केली जात आहे.या विरोधात आज पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुण शेतकरी व मानवी हक्क संरक्षण समिती यांच्यावतीने मंत्री शंभूराज देसाई व शिंदे-फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी देत मोर्चा काढण्यात आला.

यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या व शिंदे-फडणवीस सरकार विरोधात “खावून खावून 50 खोके, माजलेत बोके” अशा घोषणाही दिल्या. या घोषणांमुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना टार्गेट केल्याचे चित्र मतदार संघात दिसून आले.