बिबट्याचे पिल्लू विकणे आहे : पठ्ठ्यानं फेसबुकवर टाकली जाहिरात अन पुढे झालं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

बिबट्याचे पिल्लू विकणे आहे, अशी फेसबुकवर जाहिरात करणाऱ्या एकाला वनविभागाने अटक केली आहे. शुक्रवारी दि.23 जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून कराडच्या वनविभागाने कराड तालुक्यातील वसंतगड येथील ऋषीकेश शामराव इंगळे उर्फ लाल्या असे अटक केलेल्याचे नांव आहे.

वनविभागाने दिलेली माहिती अशी, ऋषीकेश इंगळे उर्फ लाल्या (मूळ रा.म्हसवड सध्या रा. वसंतगड ता.कराड) याने सोशल मीडियावर बिबट्याचे पिलू विकणे आहे अशी जाहिरात केली. त्यात पुढे त्याने ज्यांना हवे असेल त्यांनी व्हाट्सएपच्या फोन वर कॉल करा किंमत सांगू असे लिहिले.

सदर गोपीनिय माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ हालचाल करून सदर आरोपीच्या सोशल मीडियावर असलेली सर्व माहीत गोळा केली. तसेच इतर सूत्रांकडून त्याबद्दल माहिती काढली. सदर कारवाईसाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे किशोर धुमाळ यांनी मोलाची मदत करून आरोपीचे लोकेशन बद्दल माहिती दिली.

सदर सर्व माहितीच्या आधारावर सहायक वनसंरक्षक विलास काळे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनरक्षक रमेश जाधवर, वनरक्षक खटावकर, वनरक्षक अशोक मलप, व चालक सकटे यांनी ऋषीकेश शामराव इंगळे उर्फ लाल्या यास वसंतगड येथे त्याच्या सध्या राहत असलेल्या घरातून ताब्यात घेतले.
त्याचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे, त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे.आरोपीस उद्या शनिवार दि.24.07.2021 सकाळी 11 वाजता कराड येथे कोर्टात हजर करण्यात येणार आहे.