तांबवे येथे युवकाचा अपघातात जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लोणंद | लोणंद- सातारा रोडवर तांबवे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. ऋषिकेश प्रदीप कानडे (वय-22, रा लोणंद) असे या मृत तरुणाचे नाव आहे. ऋषिकेश लग्न कार्य उरकून घरी परताना बुधवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ऋषिकेश हा आपल्या दुचाकीवरुन सालपे येथील लग्न कार्य आटपून लोणंदकडे येत होता. दरम्यान तांबवे येथे आला असता साताऱ्याकडे जाणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने समोरुन त्याच्या दुचाकीस जोराची धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळावरुन अज्ञात चालक पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर मृतदेहावर लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी लोणंद पोलीस अधिक तपास करीत आहेत.

एकूलता एक मुलगा

प्रत्येक कामात कार्यतत्पर असणारा ऋषिकेश घरगुती वायरिंगची कामे करीत होता. माजी ग्रामपंचायत सदस्या रोहिणी कानडे यांचा तो एकूलता एक मुलगा होता. प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रभागी असणाऱ्या ऋषिकेशच्या अचानक जाण्याने मित्रपरिवारास व कुटुंबास मोठा धक्का बसला.