सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके
जावली तालुक्यातील वाळंजवाडी येथे पाण्याच्या शोधात असलेल्या सांबरावर अचानकपणे कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली. यावेळी जखमी सांबराने कुत्र्यांच्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी थेट नदीत उडी मारली. या जखमी सांबराला गावातील युवकांनी नदीतून बाहेर काढत जीवदान दिले.
जावली तालुक्यातील वाळंजवाडी येथे पाण्याच्या शोधात बुधवारी दुपारच्यावेळी एक सांबर भटकत होते. पाण्याच्या शोधात असलेल्या सांबराला कुत्र्यांनी पहिले असता. त्यांनी त्या सांबरावर अचानकपणे हल्ला चढवला. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सांबराने आपले प्राण वाचविण्यासाठी नदीत उडी मारली. हि घटना परिसरातील काही युवकांनी पहिली. त्यांनी तत्काळ याची माहिती वनरक्षक विश्वनाथ बेलोशे यांना दिली. माहिती मिळताच बेलोशे यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली तसेच गावातील युवकांच्या मदतीने जखमी सांबराला त्यांनी नदीतून बाहेर काढले.
नदीतून बाहेर काढलेल्या सांबराला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण माने यांच्याकडे नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉ. माने यांनी सांबरावर तातडीने औषध उपचार केली. उपचार करण्यात आल्यानंतर वनरक्षक विश्वनाथ बेलोशे यांनी युवकांच्या मदतीने सांबराला सुरक्षितपणे वनखात्याच्या हद्दीत सोडले.