औरंगाबाद – सुपर शॉपी, किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय रद्द करावा, असा ठराव भाजप सदस्यांनी मांडताच शिवसेनेच्या सदस्याने देशात दारूबंदी करा असा ठराव केंद्र सरकारला पाठवण्याचा आग्रह धरला. त्यामुळे ‘वाईन’ वरून काल जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना-भाजप सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. सुमारे अर्धा तास वाईन वर चर्चा झाली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी राज्यात दारूबंदी झाल्यास तुम्ही निवडणुकांना सामोरे कसे जाल, असा सवाल उपस्थित केल्याने या विषयावर पडदा पडला.
स्थायी समितीच्या बैठकीत सुरूवातीलाच सदस्य मधुकर वालतुरे यांनी राज्य सरकारने सुपर शॉपी, किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे तरूण देशोधडीला लागतील. त्यामुळे राज्य सरकारने सुपर शॉपी येथील वाईन विक्रीच्या परवानगीचा निर्णय रद्द करावा असा ठराव मांडला. या ठरावाला थेट विरोध न करता बांधकाम व अर्थ सभापती किशोर बलांडे यांनी ठराव योग्य असल्याचे नमूद करून, देशात दारुबंदी करावी असा ठराव केंद्र सरकारला पाठवावा अशी मागणी केली.
यावरून बलांडे आणि वालतुरे यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू झाली. यानंतर आरोग्य सभापती गलांडे, सदस्य केशवराव तायडे, रमेश गायकवाड, उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड आणि शिवाजी पाथरीकर यांनी या चर्चेत उडी घेतली. राज्यातील वाईन विक्रीचा ठराव आणि देशात दारूबंदीचा ठरावावर सुमारे अर्धा तास आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या.