सांगली | जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक अरुण योगिनाथ कुशिरे हा २५ हजार रुपयांची लाच घेताना सापडला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेतच त्याला पैसे घेताना रंगेहात पकडले. ऐन कोरोनाच्या धामधुमीत कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली.
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील बांधकाम विभागात कनिष्ठ सहायक लिपिक या पदावर कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या एका ठेकेदाराने केलेल्या कामांची बिले मिळण्यासाठी बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. कामासाठी ठेवलेल्या अनामतीची मुदत संपल्याने ती देखील मिळावी अशी विनंती केली होती.
या कामाची फाईल मंजूर करण्यासाठी कुशिरेने ठेकेदाराकडे ३५ हजार रुपये मागितले होते, त्यापैकी २५ हजार रुपये गुरुवारी घेऊन येण्यास सांगितले होते. तक्रारदारांकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कारवाईची माहिती काही वेळातच जिल्हा परिषदेत पसरली.