लसीकरणासाठी जिल्हा परिषदेची मोहीम! नोव्हेंबर अखेरपर्यंत 100 टक्के उद्दिष्ट गाठणाऱ्या गावांना देणार बक्षीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने असंख्य कुटुंबांचे प्रचंड हाल झाले असूनही औरंगाबादकरांनी यातून योग्य तो धडा घेतलेला दिसत नाही. कारण दुसऱ्या लाटेत कोरोनाचा तडाखा बसल्यानंतर कोरोना लसीकरणासाठी औरंगाबादमधील नागरिक म्हणावा तेवढा प्रतिसाद देत नाहीयेत. येथील नागरिक लसीकरणाबाबत प्रचंड उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरणाच्या यादीत औरंगाबाद पाचव्या स्थानावर आहे. लसीकरणाबाबत एवढा गाफीलपणा ठेवू नका, अन्यथा कधीही घात होऊ शकतो, अशा इशारा जिल्हा परिषदेचे सीईओ निलेश गटणे यांनी दिला आहे. तसेच नोव्हेंबरअखेरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करणाऱ्या गावांना बक्षीस देणार असल्याची माहितीही गटणे यांनी सोमवारी दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनीन सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोव्हिड महामारी पूर्णपणे संपलेली नाही. ती सध्या केवळ आटोक्यात आहे. असे असूनही ग्रामीण भागातील नागरिक कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणाबाबत उदासीन दिसत आहेत. ग्रामीण भागात 18 वर्षांवरील 21 लाख 69 हजार 23 नागरिक आहेत. यापैकी 11 लाख 66 हजार 847 नागरिकांनीच पहिला डोस घेतला आहे. ही टक्केवारी केवळ 54 टक्के एवढीच आहे. पहिल्या डोसच्या लसीकरण यादीत औरंगाबाद पाचव्या क्रमांकावर आहे. तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 3 लाख 58 हजार 867 एवढी कमी आहे. म्हणजेच दुसरा डोस घेतलेल्यांची टक्केवारी केवळ 16 टक्के आहे. ग्रामीण भागातील नागरिक कोव्हिड लसीकरणाबाबत उदासीन दिसत आहेत. मागील वर्षीची स्थिती पाहूनही कोरोनाला गांभीर्याने कुणी घेत नाहीयेत, असेच चित्र आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना नागरिकांना इशारा दिला आहे.

नोव्हेंबर अखेरपर्यंत कोरोना लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागासोबत, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या गावांना आणि संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष बक्षीस देण्यात येणार आहे. यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील कोव्हिड टास्क फोर्स याविषयी काही निर्णय घेणार असल्याची माहितीही गटणे यांनी दिली.