पुणे प्रतिनिधी | भाजप कार्यालयासमोर लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्लेक्सवर शेण फासल्याची घटना पुण्यात घडली आहे. नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर २ अज्ञात व्यक्तींनी शेण लावले. देहूरोड येथील बाजारपेठेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी नरेंद्र मोदी यांच्या फ्लेक्स बोर्डवर जाणीवपूर्वक शेण लावले. ही घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पक्ष कार्यालयाची साफसफाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यास ही बाब निदर्शनास आली. या घटनेची माहिती तत्काळ देहूरोड शहरातील भाजपचे पदाधिकारी तसेच पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत फ्लेक्स हटवून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावरून मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हे कृत्य केल्याच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे.
संपूर्ण देहूरोड शहरात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. भाजपचे शहराध्यक्ष कैलास पानसरे, विशाल खंडेलवाल आदींसह पक्ष कार्यकर्त्यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. हे कृत्य करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.




