टीम, HELLO महाराष्ट्र| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी ईडीकडून चौकशी होणार आहे. या कारवाईमुळे मनसैनिकांत असंतोष असून त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. या यंत्रणांना मी योग्य ती उत्तरे देईनच; तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन राज यांनी केले आहे.
ईडीने राज यांना चौकशीस हजर राहण्यास बजावल्यानंतर विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाणे येथे एका मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याचा दावा केला गेला, तर ‘राजगड’ या पक्ष कार्यालयाबाहेरही आत्महत्येचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मात्र तसे घडले नसल्याचे स्पष्ट केले.
राज यांनी पत्रक काढून शांततेचे आवाहन केले. ‘ईडी’सारख्या संस्थांना काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना मी योग्य ती उत्तरे देईन. पण, तुम्ही सर्वांनी शांतता राखा, ईडीच्या कार्यालयाजवळ कोणीही येऊ नका. तुमच्या कुठल्याही कृतीने सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही अथवा सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या, असे राज यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पोलिसांनी काही मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा देऊन कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही पाऊल उचलू नये असे बजावले आहे. ईडीच्या कार्यालयासह मुंबईतील प्रमुख भागांमध्ये विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साध्या गणवेशातही पोलिसांचा प्रत्येक घडामोडीवर वॉच असेल. त्यात, पोलीस नियंत्रण कक्षाद्वारे शहारातील मनसेचे अस्तित्व असलेल्या भागांमध्ये सीसीटीव्हींच्या मदतीनेही लक्ष ठेवण्यात येत आहे.




