नांदेड प्रतिनिधी |नांदेड जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धेतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन जणांचे हात उकळत्या तेलात बुडवून त्यांची परिक्षा घेण्याचा आघोरी प्रकार घडला आहे. बिलोली तालुक्यातील पिंपळगाव येथील ही खळबजनक घटना दोन दिवसापुर्वी घडली आहे. पिंपळगाव येथील लक्ष्मण जाधव, राम जाधव, कांताबाई जाधव यांनी बिरु शिरगिरे, संतोष हामरे आणि गंगाधर उरेकर या तिघांना घरी बोलावून ‘एक महिण्यापुर्वी मुलाचा खुन तुम्ही केलाय असा आरोप केला. आणि ‘तुम्ही जर खुन केला नाही तर कढईतल्या उकळत्या तेलात हात बुडवा’ असे सांगितले. मात्र, तिघांनी ही खुन केला नसल्याचे सांगितले.
तरीही आरोपींनी बळजबरीने बिरु शिरगिरे, संतोष हामरे,गंगाधर उमरेकर या तिघांचे हात जबरदस्तीने उकळत्या तेलात बुडवले. यामुळे तिघांचेही हात गंभीररीत्या भाजले असून, उपचारासाठी सर्वांना नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांची ही प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डाँक्टरांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणी अंधश्रध्देपोटी अघोरी कृत्य करणाऱ्या लक्ष्मण जाधव,राम जाधव आणि कांताबाई जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी त्यांच्याविरोधात जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान ह्रदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.