नवी दिल्ली । यंदाचं वर्ष कोरोना महामारी, अतिवृष्टी यांनी गाजवलं असताना आता हिवाळ्यात थंडीही अधिक कडाक्याची राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. सप्टेंबर, ऑक्टॉबर महिन्यात उष्णता जाणवत असली तरी इथून पुढे थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
यंदाचा हिवाळा हा यापूर्वीच्या हिवाळ्यांपेक्षा अधिक थंड असू शकतो. ‘नीना कंडिशन’ मुळे यावर्षी अधिक गारवा जाणवू शकतो. प्रदूषणामुळे होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे केवळ तापमानात वाढ होते असे नाही तर त्यामुळे ऋतूंचे चक्रही बदलते अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे.
भारतात ऋतुंची दिशा ठरवण्यासाठी ला नीना आणि एल नीनो अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. ला नीनाच्या प्रभावामुळे आपल्याला यंदा कडाक्याच्या थंडीला सामोरं जावं लागू शकतं. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार यांसारख्या राज्यांत गारठ्यात कुडकुडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक दिसून येते. सावधानतेचा इशारा म्हणून हवामान विभागाकडून प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक चार्ट जाहीर केला जातो. यामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत हवामानाचा अंदाज आणि माहिती दिली जाते, असंही महापात्रा यांनी म्हटलंय.