मुंबई | सरकारच्या मनात आरक्षण देण्याविषयी पाप आहे. पाप नसते तर अहवाल तातडीने सभागृहात ठेवला असता, असे म्हणत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले. आरक्षणाच्या मुद्यावर सरकारला दोन समाजांत भीमा कोरेगावसारखी भांडणे लावायची आहेत, असा आरोपही यावेळी मुंढे यांनी लगावला आहे.
धनगर, मुस्लिम समाजाला या सरकारने वा-यावर सोडले आहे. रागारागाने त्वेषाने बोलून सरकार अपयश झाकत असल्याची टीका मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. २००२ साली बीड जिल्हा परिषदेचा सदस्य असताना मी मराठा आरक्षणाची मागणी केली होती. आरक्षणावरुन माझ्याविरुद्ध घोषणा देणे हे तर भाजपचे जातीयवादी राजकारण असल्याचे ते म्हणाले.
कोणत्याही वैधानिक समितीचा अहवाल सभागृहात सादर करणे ही सरकारची जबाबदारी आहे. संविधानात तसे नमूद करण्यात आले आहे. मग अहवाल मागितल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील रागावून तावातावाने का बोलतात असा सवाल मुंडे यांनी केला. भाजप ज्या संघटनेच्या विचाराने चालते त्या संघाची भूमिका आरक्षणविरोधी असल्याचे त्यांनी सांगितले.