हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी। राज्यातील विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली असतानाच मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिखर बँक घोटाळाप्रकरणी कारवाई केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. यावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘ईडी झालीय येडी!’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. सत्यजीत तांबे यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, ‘ईडी झालीय येडी! मालकाचं ऐकून काहीही करू लागली आहे.’
दरम्यान महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे आणि मदन पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमनसह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
निवडणुकीच्या धामधुमीत हे गुन्हे दाखल करण्यात आल्यानं राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. या आरोपांनंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच्या निषेधार्थ आज बारामती आणि पुणे येथे आंदोलन करून समर्थकांकडून बंद पाळण्यात येत आहे .