सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीसाठी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून नवीन चेहऱ्याला संधी देण्याची तयारी सुरू आहे. यासाठी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सांरग पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या २२ सप्टेंबरला पक्ष्याध्यक्ष खासदार शरद पवार सातारा दौऱ्यात सांरग पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार असल्याचे सांगितले जात आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात गेल्या महिनाभरात अनेक घडामोडी घडल्या आहेत. शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपची वाट धरली. त्यानंतर काही दिवसांत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही चार महिन्यात खासदारकीचा राजीनामा देवून राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही राजेंच्या या निर्णयामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने भाजपचे दीपक पवार यांना पक्ष्यात घेऊन उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे.
यामध्ये उदयनराजेंविरोधात सिक्कीचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील यांचे नाव पुढे येत आहे. सारंग पाटील यांना कराड दक्षिण,कराड उत्तर व पाटण तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळू शकतो अशी अटकळ राष्ट्रवादीच्या गोटातून सांगितली जात आहे.