बीड । राज्यात मराठा आरक्षणाचा विषय अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी आता मराठा आंदोलन तीव्र करण्यासाठी या लढ्याचं नेतृत्व करण्याची गळ भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना घातली आहे. चाकूर तालुक्यातील बोरगाव येथील किशोर कदम या युवकाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. विनायक मेटे यांनी आज कदम कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उदयनराजे यांनी मराठा आरक्षणच्या आंदोलनाचं नेतृत्व करावं, असं आवाहन केलं.
मराठा आरक्षणलाा सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. त्यानंतरही राज्य सरकारने काहीच हालचाल केली नाही. पाच-सहा दिवस उलटून गेले आहेत. पोकळ आश्वासनापलिकडं या सरकारकडून मराठा समाजाला कोणतंही ठोस आश्वासन दिलेलं नाही, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेली आश्वासनं पोकळ असल्याची टीका मेटे यांनी केली.
मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढला पाहिजे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या व्यतिरिक्त पवारांनी मराठा आरक्षणावर काहीच भाष्य केलं नाही. ते बोलायलाही तयार नाहीत, अशी टीकाही मेटे यांनी केली. या पार्श्वभूमीवर आता उदयनराजे यांनीच आता मराठा आरक्षणसााठी पुढाकार घ्यावा. मराठा समाजाच्या भल्यासाठी त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवून नेतृत्व करावे. राज्यातील संपूर्ण मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली काम करेल, असं त्यांनी सांगितलं. मराठा आंदोलन सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे. समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी ठोस भूमिका असायला हवी. एक वाक्यता असायला हवी. कृती आराखडा असायला हवा. त्यासाठी कुणी तरी पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.