अहमदनगर | शिवसेना व भाजपच्या युतीचे चिन्हे दिसत नसल्याने शिवसेनेपाठोपाठ आता भाजपनेही उमेदवार निश्चितीकडे पाऊले उचलली आहेत. आज इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. मोठ्या शक्तीप्रदर्शनात येवून उमेदवारांनी आपली ताकद दाखवून दिली. या मुलाखती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी रघुनाथ कुलकर्णी, नगर प्रभारी आमदार सुरजितसिंह ठाकूर, कोअर कमिटीचे सदस्य जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी यांनी घेतल्या.
नगर महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपकडे उमेदवारी मागण्याला अनेकांनी प्राधान्य दिलेले आहे. त्याचाच भाग म्हणून खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत अनेक इच्छुकांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश करून उमेदवारीवर दावा केला. दुसरीकडे दुसरा गट अॅड. अभय आगरकर यांच्या कार्यकर्त्यांनीही उमेदवारीसाठी अर्ज भरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री राम शिंदे यांनीही यात लक्ष घालीत उमेदवारी देण्याबाबतचे अधिकार थेट मुख्यमंत्र्यांकडून मिळविले. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत गुप्तगू सुरू आहे. साहजिकच उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आपापल्या प्रभागातील शेकडो कार्यकर्त्यांना घेवून हे कार्यकर्ते दाखल झाले. भाजपचे झेंडे, उपरणे घेवून रॅलीने दाखल झाले.
आपल्या नेत्यांचा केला जयजयकार
नगरमध्ये भाजपमध्ये गटबाजी आहे. खासदार दिलीप गांधी, अॅड. अभय आगरकर यांच्या गटाचे संबंध टोकाला पोचलेले आहेत. वरवर कार्यक्रमात मनोमिलन झाले असल्याचे दाखवत असले, तरी आतुन धुसफूस चालूच आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक इच्छुक उमेदवार भाजपच्या नेत्यांचा जयजयकार करीत असताना आपापल्या नेत्यांचाही जयजयकार करीत होते. त्यामुळे तो कोणत्या गटाचा उमेदवार आहे, हे लगेच कळत होते.