चंद्रपूर प्रतिनिधी | भद्रावती येथे एका खासगी कंपनीच्या एटीएममधून लाखो रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणाचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे झाले होते. दरम्यान, या प्रकरणात तीन आरोनींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, एटीएम दुरुस्ती करणारा अभियंताच एटीएम दरोड्याचा मास्टरमाइंड निघाला असून, या प्रकरणात अभियंत्यासह कॅश लोडर आणि आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नितीन तुळशीराम गेडाम, मंगेश सुखदेव धाबर्डे, गोपाल भाऊराव इंगोले चंद्रपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
भद्रावती येथे ४ ऑगस्ट रोजी ‘हिताची’ कंपनीच्या एटीएममधून तब्बल २२ लाख ८४ हजार १०० रुपये आणि एटीएममधील सीपीयु अज्ञात आरोपीने पळवून नेल्याची तक्रार कंपनीचे प्रशांत वैद्य यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात नोंदविली होती. एटीएम फोडल्याची तक्रार प्राप्त होताच भद्रावती पोलीस यंत्रणा खळबळून जागी झाली. दरम्यान, घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि भद्रावती पोलिसांनी संयुक्तपणे आरोपींची शोधमोहीम सुरू केली. अभियंता नितीन गेडाम याच्याकडे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील एटीएम मेंटनन्सचे काम आहे. तर मंगेश धाबर्डे आणि गोपाल इंगोले हे दोघे कॅश लोडर आहेत.
भद्रावतीतील एटीएम नादुरुस्त असल्याने दुरुस्तीसाठी नितीन गेडाम याला बोलाविण्यात आले होते. तर रक्कम भरण्यासाठी मंगेश धाबर्डे, गोपाल इंगोले यांनाही बोलाविण्यात आले. आरोपींनी मशीनमध्ये छेडछाड करून सकाळी १६ लाख आणि रात्री उर्वरित अशी मिळून २२ लाख ८४ हजारांची रक्कम लंपास केली. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर तिघांकडूनही उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. अधिक चौकशी केल्यानंतर हे तिघेच गुन्ह्याचे आरोपी निघाले. तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. आरोपींकडून आातपर्यंत ८ लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून, आरोपींची पोलीस कोठडी घेण्यात आल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.