पुणे : शरद पवार जसे कमीतकमी जागेत शेतकऱ्यांना उत्पादन घ्यायला शिकवतात तसेच त्यांनी कमीतकमी जागेत सरकार स्थापन करण्याचा चमत्कार घडवला, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण झाले. या कार्यक्रमाला इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अर्थमंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
चिपाडासारख्या झिजणाऱ्या शेतकऱ्याला न्याय देऊ
जागा जास्त आहेत त्यामुळे आमचेच पीक येणार असे आता कोणी म्हणू नये, आम्ही कमीतकमी जागेत देखील तुमच्यावर मात करू शकतो असे बोलून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. लोकांच्या आयुष्यात गोडवा वाटत असताना शेतकऱ्यांच्या आयुष्याचे चिपाड होते, त्या चिपाडाकडे आम्ही राज्यकर्त्यांनी लक्ष नाही दिले तर या कार्यक्रमाला अर्थ उरत नाही. चिपाडासारख्या झिजणाऱ्या शेतकऱ्याला न्याय देऊ, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.