मुंबई । केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होत आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेसकडून आज राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे. केंद्रीय आस्थापनांच्या समोर काँग्रेसकडून निदर्शनं केली जात आहेत. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करावं असं आवाहन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.
याबाबत थोरात यांनी म्हटलं आहे की,मोदी सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असून केंद्र सरकारने तात्काळ हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी आज, बुधवार 16 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करत आहोत, असं थोरात म्हणाले. थोरात पुढे म्हणाले की, “काही महिन्यांपूर्वी दूध भुकटी आयात केली. आता कांद्याची निर्यात थांबवली. केंद्र सरकारचे निर्णय अनाकलनीय आहेत. म्हणून आज राज्यभर आंदोलन करत आहोत.”
केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावर शेतकऱ्यांमध्ये असंतोष
केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. केंद्राच्या निर्णयावर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. कांदा निर्यात बंदीमुळे भाव पडले तर शेतकऱ्यांना मिळत असणाऱ्या गवताच्या काडीचा आधारही जाईल आणि कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतील. हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे. केंद्र सरकारने केलेली कांद्यावरील निर्यात बंदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने तात्काळ निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. कांदा निर्यातबंदी हा शेतकऱ्यांशी केलेला गंभीर विश्वासघात अशी प्रतिक्रिया किसानसभेचे सरचिटणीस, अजित नवले यांनी दिली. केंद्र सरकार ची भूमिका दुटप्पीपणाची आहे. कांदा निर्याती बंदीच्या केंद्राच्या आकस्मिक निर्णयामुळे भारताची बेभरवशाचा देश अशी प्रतिमा बनेल, असं खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.