कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिक प्रवास करणे टाळत आहेत. त्याचा फटका कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला (रेल्वे स्थानक) बसला आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये तिकीट आरक्षण ५० टक्क्यांनी कमी झाले असून, प्रवाशांची संख्या १५ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे स्थानक परिसरात शुकशुकाट पसरला आहे. दक्षता म्हणून विविध रेल्वेच्या डब्यांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण रोज करण्यात येत आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये केले आहे. त्यासह विश्रांतीगृहाची सुविधा बंद करण्यात आली आहे. स्थानकासमोर असलेले मंदिरही दर्शनासाठी बंद केले आहे.
तिरुपती, दिल्ली, मुंबई, आदी ठिकाणी जाण्यासाठी केलेले तिकीट आरक्षण रद्द करण्यासाठी प्रवाशांचा ओघ वाढला आहे. रद्द तिकिटांपोटी रोज सुमारे दोन ते अडीच लाख रुपये परत देण्यात येत आहे. दि. १ ते १० मार्च दरम्यान एकूण १५ टक्क्यांनी प्रवासी कमी झाले आहेत.विविध रेल्वेच्या डब्यांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छतेचे काम स्थानकावरील डेपोमध्ये सुरू करण्यात येत आहे. रेल्वेच्या मुंबई कार्यालयाने स्थानकावरील व्यवस्थापन, सीएनडब्ल्यू, आॅपरेटिंग, इंजिनिअरिंग, ट्रेन लायटिंग, सफाई, आदी विभागांतील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मिरज येथून डॉक्टर जॉन आणि आरोग्य सहायक दाखल झाले आहेत.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.