क्रिकेटपटू मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या अडचणी वाढल्या आहेत. पत्नी हसीन जहाँने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केल्याने शमीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालच्या अलीपूर कोर्टाने हे वॉरंट जारी केलं आहे. क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हसीद अहमद या दोघांविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. सरेंडरसाठी त्याला कोर्टाने १५ दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत शमी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करु शकतो असेही कोर्टाने म्हटले आहे. मात्र शमीविरोधात आणि त्याच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याने त्याच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप मोहम्मद शमीच्या पत्नीनं फेसबुकवरून केल्यानं गेल्यावर्षी एकच खळबळ उडाली. शमीची पत्नी हसीन जहाँने फेसबुकवर शमीच्या काही अश्लील चॅट्स आणि काही मुलींचे फोटोही अपलोड केलं होते. यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. नागपूर, कोलकाता, कराची, काश्मीर आणि बेंगळुरुतील तरुणीचे शमीशी संबंध आहेत, असा आरोप त्याच्या पत्नीनं फेसबुक पोस्टद्वारे केला होता.

हसीन जहाँने केलेल्या आरोपांनंतर या दोघांचाही वाद चव्हाट्यावर आला. मोहम्मद शमी, त्याचा भाऊ, त्याची आई  हे आपला छळ करत असल्याचाही आरोपही हसीन जहाँने केला होता. पैशांसाठी आपल्याला उपाशी ठेवले गेले, माझा मानसिक आणि शारिरीक छळ केला असाही आरोप हसीन जहाँने केला होता. आता या सगळ्या प्रकरणात पश्चिम बंगाल येथील अलीपूर कोर्टाने मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे.

Leave a Comment