सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर जत विधानसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. तशी चाचपणी त्यांनी सुरू केली आहे. या मतदारसंघात धनगर समाज व वंचित घटकाची मते मोठ्या प्रमाणात असल्याने व लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघात ५३ हजार मते मिळाल्याने त्यांनी मतदारसंघातून लढण्यासाठी पसंती दिली आहे. येत्या आठ दिवसात याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यांनी या निवडणुकीत अडीच लाखांच्यावर मते मिळवली होती. जत विधानसभा मतदारसंघातून त्यांना 53 हजार मते पडली होती. त्यामुळे विधान सभेची निवडणूक गोपीचंद पडळकर जत विधानसभा मतदार संघातून लढवणार का? याची चर्चा सुरू होती. तसेच खानापूर-आटपाडी व सांगोला विधानसभा मतदारसंघात देखील त्यांनी चाचपणी केली होती. मात्र त्यांची पसंती जत विधानसभेसाठी आहे. जत तालुक्यात दि. 8 सप्टेंबरला रोजगार मेळावा देखील पडळकर यांनी घेतला आहे. त्यासाठी पुणे, मुंबई येथील अनेक कंपन्यांशी संपर्क साधला आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, लोकसभेला जत मदारसंघात मी एक रूपयाही खर्च केला नाही. लोकांनी भरभरून प्रेम दिले, 53 हजार मते देवून माझ्यावर विश्र्वास दाखवला. त्यामुळे जतच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतो. जत तालुक्यातील बेकार तरूणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. तसेच येणाऱ्या विधानसभेसाठी जत मतदार संघाला माझी अधिकची पसंती असल्याचे त्यांनी जाहीर केले.