जालना प्रतिनिधी। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सोनसाखळी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केल्याची माहिती समोर आली आहे. आकाश उर्फ चोख्या शिंदे, सचिन बाबू गायकवाड आणि राम निकाळजे या तीन सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद केल आहे.
या तिघांनी जालन्यात 8 ठिकाणी सोनसाखळी लांबविण्याच्या घटनासह जबरी चोऱ्या व घरफोड्या केल्याचे ही पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या चोरट्यांकडून साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जिल्ह्यातील अनेक चोऱ्या, घरफोड्या आणि सोनसाखळी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
जालना शहर आणि परिसरात काही दिवसांपासून चैन स्नॅचिंग, जबरी चोरी आणि घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळं पोलीस अधीक्षक एस चैतन्या यांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊन आदेशित केल्या होत्या. दरम्यान तीन अट्टल चोर कैकाडी मोहल्ल्यात थांबले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गौर यांना एका खास खबऱ्याने दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं सापळा रचून या चोरांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या तीनही आरोपींनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केल्याचे कबुल केले.