सांगली प्रतिनिधी | इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर यांनी १८ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.काका रामू पवार असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. हा गुन्हा तासगाव तालुक्यातील नरसेवाडी येथे १६ ऑगस्ट २०१४ रोजी घडला होता. पीडित मुलगी तिसरीत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होती. मधल्या सुट्टीत ती तिच्या मैत्रिणीसोबत शाळेच्या आवारात खेळात होती.
त्यावेळी आरोपीने त्या मुलीकडे जाऊन तिला २ रुपये देऊन तिला खाऊ आणण्यासाठी म्हणून शाळेच्या समोर असलेल्या शेतात नेऊन तिला दारू पाजण्याचा प्रयत्न करू लागला. ती मुलगी आरडा ओरड करू लागली.त्यावेळी शेतातील वस्तीवर राहणारी महिला आवाजाच्या दिशेने आपल्या मुलासोबत गेली. त्यावेळी तो त्या मुलीला दारू पाजण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ मुलीला आरोपीच्या तावडीतून सुटका करून घरी पाठवले. त्यामुलीने ही घटना आईला सांगितली.
पीडित मुलीच्या आईने हा प्रकार गावातील लोकांना सांगितला. मुलीच्या आईने तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश बनकर यांनी केला. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. पीडित मुलगी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तपास पूर्ण करून आरोपीच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. काका पवार याने या घटनेच्या ७ ते ८ महिने अगोदर गावातील ५ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. सदरचे प्रकरण गावपातळीवर मिटवण्यात आले होते. याकामी सरकारी पक्षातर्फे ४ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी पुराव्याच्या आधारे आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आज आरोपीला शिक्षा सुनावली.