दादासाहेब गवई यांचे स्मारक ज्ञानकेंद्र केंद्र म्हणून ओळखले जाणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती | सतिश शिंदे

दादासाहेब गवई हे ज्ञानी होते आणि त्यांना सर्वसामान्य माणसाच्या व्यथा-वेदनांची जाणीव होती. ज्ञान आणि जाणिवा यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात झाला होता. त्यांचे स्मारक ज्ञानकेंद्र म्हणून ओळखले जावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसारात आज रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई स्मारक संकुलाचा पायाभरणी समारंभ पार पडला. यावेळी गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉ.सुनील देशमुख, खासदार आनंदराव अडसूळ, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भुषण गवई, कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर, आमदार अरुण अडसड, डॉ.अनिल बोंडे, रवि राणा, अॅड.यशोमती ठाकूर, प्रभूदास भिलावेकर, रमेश बुंदिले, विरेंद्र जगताप, महापौर संजय नरवणे, कमलताई गवई, डॉ.राजेंद्र गवई आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, दादासाहेब गवईंनी आमदार-खासदार, सभापती, राज्यपाल म्हणून काम केले. ते ज्या पदावर गेले, त्या पदाचा सन्मान वाढविण्याचे कार्य त्यांनी केले. बिहारमध्ये राज्यपाल असताना त्यांनी प्रामुख्याने शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील प्रयोग राबविले. त्यांच्या या कार्याची आठवण आजही काढली जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार उच्चशिक्षीत पिढी तयार होण्यासाठी त्यांनी नागपूर येथे महाविद्यालय सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच तेथे शैक्षणिक क्षेत्रात गुणात्मक वाढ झाली आहे. त्यामुळे आज गुणवंत विद्यार्थ्यांचा ओढा नागपुरातील आंबेडकर महाविद्यालयाकडे असतो. संस्थेच्या विकासासाठी त्यांनी कठोर निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणीही केली. त्यामुळे आज संस्थेचा नावलौकिक आहे.

शिक्षण क्षेत्रासोबतच त्यांनी सामाजिक क्षेत्रात कार्य केले. दिक्षाभूमीच्या उभारणीत त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वात दिक्षाभूमी उभी राहिली आहे. आज संसाधनांची उपलब्धता आहे. परंतू ज्या काळात संसाधने नव्हती, निधीची कमतरता होती, अशा कठीण काळात जगाला अभिमान वाटावे, असे स्मारक उभे राहिले आहे. जगभरातील पर्यटक नागपूरातील दिक्षाभूमीला भेट देतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा दर्जा स्मारकाला मिळाला आहे.

दादासाहेब गवई हे राजकारणापलीकडील व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सर्वांसोबत पारिवारीक स्नेह जपला. विचारांची देवाण-घेवाण, सौहार्दतेमुळे एका उंचीचा सभापती राज्याला लाभला. त्यामुळे तणावाच्या परिस्थितीत सभागृहातील मोठे नेतेही त्यांचे निर्देश पाळत असत. ज्ञानाचा खजीना, उत्तम जाण, एखाद्या गोष्टीवर प्रभूत्व गाजविण्याची क्षमता, उमदे व्यक्तिमत्त्व यामुळे ते लोकप्रिय झाले. दादासाहेबांचा मान आणि व्यक्तिमत्त्वाला साजेल असे स्मारक येथे होत आहे. त्यांच्या स्मारकातून प्रेरणा मिळेल, त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य होईल. विद्यापिठाने या स्मारकाची देखभाल करून ते ज्ञानार्जनाचे केंद्र बनवावे, असे सांगितले.

यावेळी आमदार डॉ.सुनील देशमुख यांनी दादासाहेब गवई यांच्या नेतृत्वगुणांचा गौरव केला आणि त्यांचे व्यक्तिमत्व चौफेर होते, असे सांगितले. तर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी लक्ष घातल्याने व पुढाकार घेत पाठपुरावा केल्यामुळे हे स्मारक उभे राहत आहे, अशी भावना डॉ.राजेंद्र गवई यांनी व्यक्त केली.

सुरुवातीला मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी रा. सू. गवई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्ज्ववलन केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठातर्फे कुलगुरू श्री.चांदेकर यांनी मुख्यमंत्री यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी स्मारकस्थळी पायाभरणी करून कोनशिलेचे अनावरण केले. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ.अजय देशमुख यांनी आभार मानले.