अकोला प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यातील अकोट येथील दिव्यांग गिर्यारोहक धीरज बंडु कळसाईत या 22 वर्षीय युवकाने रशियातील सर्वोच्च हिम शिखर माऊंट एलब्रुस सर करीत भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्य भारतीय तिरंग्याला अनोखी मानवंदना दिली. त्याच्या या विक्रमामुळे अकोला जिल्हाच्या नव्हे तर महाराष्ट्रच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. एक हात, एक पाय नसतांना सुध्दा जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व धाडसाच्या बळावर धीरजने हे शिखर गाठले. भारतातून हे शिखर सर करणारा धीरज कळसाईत हा पहिला दिव्यांग असल्याचे मानले जात आहे.
यापुर्वी धीरजने दक्षिण आफ्रीकेतील माऊंट किलीमंजारो हे हिमशिखर सर केले होते. असे करणारा तो पहिला भारतीय दिव्यांग गिर्यारोहक ठरला. त्याच्या या विक्रमाची इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड व महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डला नोंद सुध्दा करण्यात आली. रशियातील माउंट एलब्रुस या शिखराची उंची ५ हजार ६४२ मीटर एवढी असुन अत्यंत प्रतिकुल वातावरणात चढाई करावी लागते. हे शिखर संपु्र्णतः बर्फाच्छादित आहे. त्या ठिकाणचे तापमान उणे असुन कडाक्याची थंडी व खडतर वातावरणाशी दोन हात करीत अकोटच्या धीरजने धाडसीवृत्तीचा पुन्हा एकदा परिचय दिला आहे.
शारिरीक दृष्ट्या सुदृढ असलेल्या गिर्यारोहकाला सुध्दा सदर शिखर सर करणे अनेकवेळा अशक्यप्राय ठरते. अशा या शिखरावर धीरजने पोहचून देशाचा तिरंगा फडकवून मानवंदना देत भारताचा दिव्यांग सुध्दा जगाच्या पाठीवर कुठंही कमी नसल्याचे दाखवून दिले. धिरज याने १५ ऑगस्ट रोजी रात्री चढाईला सुरुवात करुन १६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता शिखर गाठले. शिखरावर पोहोचताच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन त्याने भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा फडकविला आणि मानवंदना देत राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.