कोल्हापूर प्रतिनिधी | ‘नाव स्वाभिमानी, धंदे मात्र बेईमानीचे. शासनाला हाताशी धरून शेतकरी नेत्यांनीच शेतकऱ्यांना लुटले ‘असा सणसणीत टोला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज माजी खासदार राजू शेट्टी आणि नामदार सदाभाऊ खोत यांना लगावला आहे. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते. रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली आहे. याविषयी माहिती ते देत असतांना यासंबंधी माहिती देण्यासाठी रघुनाथदादा पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली होती.
हे सांगत असताना पाटील यांनी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली. कडकनाथ अंडी आणि कोंबडी घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे ,दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. एका बाजूला राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 325 एकर शेती घेतली आहे. तर दुसर्या बाजूला कडकनाथ कोंबडी अंडी घोटाळा प्रकरणातून नामदार सदाभाऊ खोत यांच्या जवळच्या नातेवाईकाने शेतकरी लोकांना लुबाडले. एकूणच शासनाला हाताशी धरून शेतकऱ्यांचे नेते शेतकर्यांना लुबाडतात त्यांच्या संघटनांचे नाव स्वाभिमानी असल् तरी धंदे मात्र बेईमानीचे आहेत असा स्पष्ट आरोप रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी केला.
गेल्या वीस वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या या देशात वाढल्या आहेत. मात्र केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने कोणतेही धोरण शेतकरी निश्चित झालेलं नाही. याच बरोबर साखर कारखानदारांनी यंदाची एफ आर पी ची किंमत बुडवली आहे. या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी पंढरपुरात तीन सप्टेंबर रोजी शेतकरी परिषद होत आहे’ असेही रघुनाथदादा पाटील यांनी स्पष्ट केले.