परभणी प्रतिनिधी। ऑक्टोबर मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाथरी विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दोन वेळा सुरुंग लावण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक वेळ अपक्ष यशस्वी झालेले आहेत. १९९० पासून मतदारसंघात सलग ३ वेळा शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या रूपाने हॅट्रिक केली होती. २००४ मध्ये राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे विद्यमान आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शिवसेनेचे विजयी घोडदौड रोखली होती .
२००९ साली पाथरी विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. त्यापूर्वी सेलू तालुका व पाथरी तालुका मिळून विधानसभा मतदारसंघ होता. पुनर्रचनेनंतर मात्र शेजारील शिंगणापूर मतदारसंघ पाथरी विधानसभेत विसर्जित करण्यात आला. त्यामुळे मानवत, सोनपेठ संपूर्ण तालुके तर परभणी तालक्याूतील काही गावे असा मिळून नवीन पाथरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. मतदारसंघात ३९४ मतदान केंद्र असून ३ लाख ४७ हजार ४५१ मतदार आहेत . यामध्ये १ लाख ८० हजार ९९१ पुरुष मतदार तर १ लाख ६६ हजार ४५८ महिला मतदार तर इतर २ मतदार आहेत .यामध्ये नुकत्याच नुतन नोंदणी केलेल्या २ हजार ७४ हजार नुतन मतदारांची भर पडली आहे.
पुनर्रचनेनंतर मात्र कोणत्याही एका पक्षाला सातत्याने विजय घेता आला नाही. २००९ साली मीरा रेंगे यांच्या रूपाने शिवसेनेला विजय मिळवता आला परंतु 2014च्या निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार मोहन फड यांनी सर्वच पक्षांना धूळ चारत विजय मिळवला. यावेळी अपक्ष निवडून आलेले मोहन फड यांना एकोणसतर लाख ऐंक्याऐंशी हजार तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांना ५५ हजार ६३२ मते मिळाली होती .यावेळी सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. २०१४ नंतर आज पर्यंत बरीच आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. प्रत्येक वेळी आयात केलेला उमेदवार पाथरी विधानसभा मतदार संघावर राज्य करत असल्याने त्याला स्थानिक लोकांचे प्रश्न समजत नसल्याची मतदार संघातील लोकांची भावना आहे .त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये भूमिपुत्रांनी किल्ला लढवण्याचे ठरवल्याचे दिसत आहे.
पाथरी शहर व तालुका सोडले तर मानवत सोनपेठ व परभणी तालुक्यातील मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावांचा विकास न झाल्याने , कापुस उत्पादकांचा मतदारसंघ असताना मानवत येथे टेक्सटाईल मिल नाही. गेल्या तेरा वर्षापासून गोदावरीवरील तारू गव्हाण येथील उच्च पातळी बंधाऱ्याचे काम रखडले असल्याने गोदावरी किनाऱ्यावरील गावांचा सिंचनाचा मोठा प्रश्न प्रलंबित आहे. पाथरी सोनपेठ रस्त्याची दुरवस्था झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी, प्रवाशांचे हाल अजूनही थांबलेले नाहीत, शिक्षण, आरोग्य , स्थानिक ठिकाणी मोठे उद्योग व्यवसाय नसल्याने मतदारसंघातील नागरिकांना जिल्ह्यामध्ये कामासाठी स्थलांतर करावे लागते. यामुळे रोजगाराचाही प्रश्न सुटलेला नाही. जायकवाडीच्या पाण्यामुळे व गोदावरी बंधाऱ्यावर बांधण्यात आलेल्या उच्च पातळी बंधारा बंधाऱ्यामुळे मतदार संघ बऱ्याच अंशी सिंचनाखाली येतो परंतु सातत्याने पडणारा दुष्काळ व शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारणी न झाल्याने बहुसंख्य शेतीवर अवलंबून असणाऱ्या येथील लोकांंच्यासमोर अनंत समस्या उभ्या राहिलेल्या आहेत. त्या सोडवणारा व विकासाची दृष्टी असणारा स्थानिकांना उमेदवार व आमदार हवा आहे. अशी मतदारांची भावना आहे.
या सगळ्यामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला मताचा मोठा टक्का मिळालेले पाथरी मतदारसंघातील होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडी फॅक्टर प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कडून लढण्यास इच्छुकांची भाऊगर्दी आहे ,
इच्छुकांची भाऊगर्दी असली तरी युती-आघाडी यांच्या निर्णयानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सोबत विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी व शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांचे वजन कोणाच्या पारड्यात पडत यावरून विधानसभेचा उमेदवार तर शेवटी सुज्ञ मतदारच आमदार ठरवणार आहेत .