सातारा प्रतिनिधी , सकलेन मुलाणी | गेल्या दोन दिवसांपासून भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त गावांच्या भेटी घेत आहेत.दरम्यान आज कराड परिसरातील पूर पीडित कुटुंबियांच्या त्यांनी भेटी घेऊन त्यांची विचारपूस केली. दरम्यान या भेटीत कराडच्या पाटण कॉलनीतील पूरग्रस्तांना शासनाकडुन अद्याप कुठलीही मदत पोहचवली गेली नसल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या समोर आला. तेव्हा येथील पुरग्रस्त रहिवाशींना तातडीने शासनाने तातडीने मदत दयावी अन्यथा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला.
पाटण कॉलनीतील एकूण 45 कुटुंबाना पूराचा फटका बसला असून या भांगात राहणारे निवासी पूररेषेतील अतिक्रमणधारक असल्याने त्यांना अद्याप शासनाची कुठलीही मदत मिळाली नसल्याची बाब यावेळी समोर आली. याबाबत त्यांनी स्थानिक नागरिकांकडून माहिती घेतली. येथील पूरग्रस्तांनीही रोख रकमेत कसलीही मदत मिळाली नसल्याचे सांगितले. या संपूर्ण गोष्टीबाबत तृप्ती देसाई यांनी कराडच्या प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना संपर्क साधत जाब विचारला असता, “शासनाकडुन संबंधित पूर रेषेतील अतिक्रमणधारक पुरग्रस्त निवासी नागरिकांना मदत देणेबाबत माहिती घेऊन त्यांना मदत दिली जाईल”. असे आश्वासन खराडे यांनी फोनवर दिले.
“कराडच्या पाटण कॉलनीतील पूरग्रस्तांना मदत न देऊन भाजप सरकार राजकारण करत आहे. येथील रहिवाशींना मदत मिळाल्यास त्याचे श्रेय कराडमध्ये राहणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मिळेल या भीतीपोटी भाजप सरकार हे घाणेरडे राजकारण करत आहे.” असा आरोप यावेळी तृप्ती देसाई यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना केला.