पुणे : सद्या फुले पगडी आणि पेशवाई पगडी यावरुन महाराष्ट्रभर जोरदार चर्चा सुरु आहे. पुणे येथील राष्ट्रवादीच्या पक्षीय कार्यक्रमात शरद पवार यांनी पेशवाई पगडी न स्विकारता फुले पगडीला प्राधान्य दिले होते. सध्या महात्मा फुलेंच्या विचांराची महाराष्ट्राला गरज आहे असेही प्रतिपादनही पवार यांनी केले होते. फुले पगडी आणि पेशवाई पगडी संदर्भात आपले मत काय? असा प्रश्न भा.रि.प. बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना विचारला असता “पेशवाई पगडीला आमचा विरोधच आहे” असे ते म्हणाले. शरद पवार यांनी महात्मा फुलेंची पगडी पहिल्यांदाच स्विकारली आहे आणि त्याचा आम्हाला आनंद आहे असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीला बहुजन आघाडीमधे येण्याची संधी आहे काय असे विचारले असता “मी शरद पवारांना प्रतिगामी मानत नाही, परंतु त्यांच्या काही कृती प्रतिगामीच आहेत. त्यांनी त्यांच्या काही कृतींमधे सुधारणा करण्याची गरज आहे. शरद पवारांनी त्या सुधारणा केल्या तर त्यांचे वंचित बहुजन आघाडीमधे स्वागत असेल असेही आंबेडकर म्हणाले.