बुलढाणा प्रतिनिधी | ताट-वाटी वाजवून, दारासमोर कचरा टाकून, घंटानाद करून, रस्त्यावर घोषणा देऊन आंदोलन केल्याची विविध उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. पण पोलीस स्टेशनमध्येच ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं पारायण करत आपलं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याची गोष्ट तुम्हाला माहित आहे का ? सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी खुर्द गावच्या लिंबाजी विठोबा डोईफोडे या शेतकर्याने असेच एक आंदोलन चालू केले आहे. डोईफोडेनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 2 सप्टेंबर पासून किनगांव राजा पोलीस स्टेशनमध्येच बुधवारी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करत आंदोलनाला सुरवात केली.
या शेतकर्याने विविध मागण्यांसाठी सुरू केलेले हे अभिनव आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लिंबाजी विठोबा डोईफोडे या शेतकर्याने विविध मागण्यांसाठी किनगांवराजा ठाणेदारांना निवेदन दिले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत किनगाव राजा पोलिस स्टेशन मध्ये पारायण वाचून आंदोलन सुरुच राहिल असा डोईफोडे यांनी इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे पोलिसही चक्रावले असून अशा परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा हा प्रश्न पोलिसांना पडला आहे.