जयपूर | स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीतील ब्रिटिशांचे खबरे काँग्रेस पक्षाच्या वारशाबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत, अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसला लक्ष करणाऱ्या भारतीय जनता पक्षावर टीका केली. काँग्रेस पक्षाच्या 135 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
गेहलोत म्हणाले की, ‘काँग्रेस पक्षाचा वारसा मोठा आणि मजबूत असून तो अभिमान वाटावा असा वारसा आहे. काँग्रेसच्या या वारशाबाबत संपूर्ण देशाने अभिमान बाळगायला हवा. असे असताना पंतप्रधान मोदी काँग्रेसच्या वारशाबाबत काय म्हणतात हे तुम्हाला माहीतच आहे. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वारशाबाबतही काय वक्तव्य केले आहे, ते तुम्हाला माहीत आहे.’
भारतीय जनता पक्षावर टीका करताना गेहलोत पुढे म्हणाले की, पंडित नेहरू यांचा वारसा हा बलिदानाचा आहे, देशासाठी तुरुंगात जाण्याचा आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी देशासाठी शहीद झाले. हा वारसा आहे. आणि तुमच्या पक्षाच्या विचारधारेचे लोक स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी ब्रिटिशांचे खबरे होते. असे लोक आज काँग्रेस पक्षाच्या वारशावर बोलत आहेत.
देशातील सर्व लोकशाही प्रणालीतील संस्था उद्ध्वस्त केल्या जात आहेत. न्याय व्यवस्था, निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी आणि आयकर विभागावर दबाव आहे. पंतप्रधान कार्यालयाला विचारल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलले जात नाही. सर्व निर्णय हे पंतप्रधान कार्यालयातून घेतले जात आहेत.