अमरावती प्रतिनिधी। भाजपाची पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही घोषणा केली. सोबतच बहुप्रतिक्षीत असलेल्या यादीत सर्वांचे लक्ष लागून असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघाच्या उमेदवारांची देखील नावे जाहीर झाली आहेत.
या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत अमरावती जिल्ह्यातील ३ नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे तिघेही सध्या आमदार असून पक्षाकडून पुन्हा या उमेदवारांवर विश्वास दाखविण्यात आला आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत अमरावतीचे पालकमंत्री व राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, अमरावती शहराचे आमदार डॉ. सुनील देशमुख आणि अनुसूचित जाती करिता राखीव असलेला दर्यापूर मतदार संघातून विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपा – सेनेची युती झाली असल्याने आता ८ मतदार संघापैकी ४ मतदार संघ हे भाजपच्या वाट्याला जाणार असून त्यापैकी अमरावती शहर, मोर्शी – वरुड, दर्यापूर या तीन ठिकाणी भाजपने आपले उमेदवार घोषित केले आहेत. आता चौथा मतदार संघ अद्याप घोषित व्हायचा असून तिथे कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्ते आणि नेते जोरदार तयारीला लागले आहेत.