मुंबई : सुरक्षा नसल्याने काही बरेवाईट झाले तरी ती सर्वस्वी माझी जबबादारी राहील असे म्हणत अण्णा हजारे यांनी मुखयमंत्र्यांना पत्र लिहून पोलीस संरक्षण नाकारले आहे.महिलांची सुरक्षेसंबंधीच्या विविध मागण्यांसाठी हजारे यांचे २० डिसेंबरपासून राळेगणसिद्धीत मौन व्रत सुरू आहे. हे व्रत सुरू असतानाच अण्णांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सुरक्षेबाबत आपले मत सरकारला कळवले आहे.
राज्य सरकारच्या सुरक्षा समितीने राज्यातील ९० मान्यवरांच्या सुरक्षेचा आढावा घेतला व आवश्यकतेनुसार सुरक्षेत बदल केले आहेत. यात अण्णा हजारे यांना झेड सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अण्णा हजारे यांना आधी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यात बदल करून आता झेड सुरक्षा देण्यात आली आहे.
मी मरणाला घाबरत नाही
अण्णा हजारे यांनी पत्रात म्हंटले आहे की, मला काही लोकांकडून धमक्या आल्या हे खरे आहे. मात्र, आपण मरणाला घाबरत नाही. लष्करी सेवेत असतानाच एकदा मरणाने हुलकावणी दिलेली आहे. मुख्य म्हणजे सुरक्षा व्यवस्था असली म्हणजे मरण येणारच नाही, याची खात्री नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना कडक सुरक्षा व्यवस्था असूनही मरण आले. त्यामुळे मलाही मरण यायचे असेल तेव्हा येईल.