बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : बीड जिल्ह्यातील एका जिवंत शेतकर्याला महसूल प्रशासनाने चक्क मृत ठरविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात संबंधित शेतकर्याने मला मृत कुणी ठरविले असा जाब अधिकार्याला विचारला; मात्र ढिम्म प्रशासनाने उत्तर न दिल्याने शेतकर्याने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न करणार्या शेतकर्यास महसूल प्रशासनाने ऑनलाईन नोंदीत तुम्ही मृत असल्याचे स्टेटस दाखविले. आपण तर जिवंत आहोत आणि हा काय प्रकार? असा प्रश्न शेतकर्याला पडला. मनस्ताप झालेल्या या शेतकर्याने हा प्रकार चव्हाट्यावर आणून न्याय मिळण्यासाठी थेट पोलिस ठाणे गाठले. शहरातील अनुपकुमार गणेशप्रसाद मिश्रा यांच्या नावे शेतजमीन आहे. चार डिसेंबरला त्यांनी पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन फॉर्म भरला; परंतु त्याची पडताळणी करून अर्ज मंजूर होऊन त्यांच्या बँक खात्यावर रक्कमच जमा झाली नाही.
त्यामुळे ते तहसील कार्यालयात गेले. त्यांना पैसे मिळण्याबाबत अडचणी काय आणि त्रुटी काय? याचे समर्पक उत्तर देण्याऐवजी ऑनलाईन नोंदीत मृत असल्याचा स्टेटस रिपोर्ट हाती देण्यात आला.संबंधित कारकून कानावर हात ठेवून रिकामा झाला; पण हा प्रकार ऐकून अनुपकुमार मिश्रा यांना धक्काच बसला. अनुप मिश्रा यांनी आधार कार्ड दाखवून ज्यांनी वा यंत्रणेने मृत्यू प्रमाणपत्र दिले, त्याची माहिती द्यावी, अशी मागणी केली. तरीही यंत्रणा समाधान करू शकली नाही. यामुळे त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन कारवाईची मागणी केली.