पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कराड तालुक्यातील टेम्भू गावात जन्मलेल्या ‘या’ सातारकर माणसाने केलीय

thumbnail 1531516886798
thumbnail 1531516886798
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

“इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार” या ब्रीद वाक्याला अनुसरून स्थितीशील समाजाला आधुनिक विचारांनी गतिमान करणाऱ्या जहाल समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर त्यांचा जीवणप्रवास, शिक्षण, कार्य, विचार याबद्दल आपण अधिक जाणुन घेऊयात.

गरीबीतून शिक्षण

१४ जुलै १८५६ रोजी कराड जवळील टेंभू या गावी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला. कराडला प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न या १२ वर्षाच्या मुलापुढे उभा होता. घरची परिस्थिती गरिबीची होती तेव्हा नाखुषींनी त्यांनी कराड ला मामलेदार कचेरीत उमेदवारी सुरू केली. परंतु शिकण्याची दुर्दम्य इच्छा शक्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षण घेताना अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत होते. घरच्या गरीबीमुळे शिक्षणाच्या काळात त्यांनी कारकून, कंपाऊंडर असे नाना प्रकारचे काम केले. विद्यार्थी दशेत असताना “वऱ्हाड समाचार ” मध्ये नियमित लेख लिहून त्यांना उपजीविका करावी लागली. अखेर अकोल्यामधे आगरकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.

पुण्यातील डेक्कन काॅलेजमधील दिवस

उच्च शिक्षणासाठी आगरकरांनी पुणे गाठले. पुण्यातील डेक्कन कॉलेज मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. डेक्कन कॉलेज मध्ये शिकत असताना आगरकर आपला एकुलता एक सदरा धुऊन वाळवत व तो दिवसा वापरत असत. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत १८७८ ला आगरकर बी.ए. पास झाले. दरम्यान आगरकरांची आणि लोकमान्य टिळकांची भेट झाली. टिळकांच्या सूचनेप्रमाणे आगरकरांनी पुढे इतिहास आणि तत्वज्ञान विषयांत एम.ए. ची पदवी मिळवली.

देशसेवेची शपथ

त्या वेळी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला पैसा आणि प्रतिष्ठा मिळविणे सहज साध्य होते परंतु या व्यावहारिक सुखाकडे पाठ फिरवून टिळक आणि आगरकरांनी देशसेवा करण्याचा निश्चय केला. त्यामुळे एवढं शिक्षण घेतल्यावर आगरकर आपल्या आईला पत्राद्वारे असे कळवतात की “आई, तुझा मुलगा खूप शिकला आहे. आता त्याला चांगल्या पगाराची नौकरी मिळेल असं तुला वाटत असेल. पण आई, मी तुला आताच सांगतो, मी पोटापूरता पैसा कमविणार असून सर्व पैसा लोकहितार्थ खर्च करणार आहे “. देशसेवा करण्यासाठीच आगरकरांनी शिक्षणाचा मार्ग निवडला होता.

पुण्यात न्यु इंग्लिश स्कूल, डेक्कन इज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज ची स्थापना

टिळक आगरकर , चिपळूणकर एकत्र आले आणि १८८० मध्ये पुण्यात “न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना करून शैक्षणिक क्रांतीचं बीज रोवले. ध्येयवादी विद्वान शिक्षक न्यू इंग्लिश स्कूल ला लाभल्यामुळे अल्पावधीतच न्यू इंग्लिश स्कूल लोकप्रिय झाले. न्यू इंग्लिश स्कूल चे पुढचे पाऊल म्हणून डेक्कन इज्युकेशन सोसायटी ची स्थापना करण्यात आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने तरुणांच्या उच्च शिक्षणाच्या सोईसाठी २ जानेवारी १८८५ रोजी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. वामन शिवराम आपटे हे फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य झाले त्यांच्या अकाली निधनानंतर आगरकरांनी फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्य पदाची धुरा सांभाळली. १८९२ ते १८९५, आगरकर फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. इतिहास आणि तत्वज्ञान हे विषय आगरकर कॉलेज मध्ये शिकवत असत.

पत्रकारितेतून लोकशिक्षणाचे कार्य

देशसेवेसाठी त्यांना शिक्षण हे क्षेत्र अपुरे वाटू लागले. तरुण विद्यार्थ्यां प्रमाणे सामान्य जनतेलाही लोकशिक्षण देणे त्यांना आवश्यक वाटू लागले. या जाणिवेतूनच १ जानेवारी १८८१ “मराठा” या इंग्रजी आणि ४ जानेवारी १८८१ रोजी “केसरी” या मराठी वर्तमानपत्राचा जन्म झाला. आगरकर केसरीचे संपादक झाले. बुद्धिप्रामाण्यवादी आगरकरांनी केसरीतून ७ वर्षे आणि पुढे सुधारक वर्तमानपत्रातून ७ वर्षे लेखन करून स्थितीशील समाजाला आधुनिक विचार दिला. देशात स्वतंत्रपणे विचार करणारे लोक निर्माण झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही असे आगरकरांनी ठाम पणे मांडलेले मत आजच्या व्यक्तीपूजक समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. जातीसंस्थेमुळे आपल्या समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे. जातीधर्माच्या भ्रामक संकल्पनेमुळे विद्या, कला,आणि शास्त्रे यांची वाढ खुंटली असून सामाजिक विषमता वाढीस लागली आहे.

जातीव्यवस्थेला विरोध आणि आरक्षणाला पाठींबा

पुणे नगर पालिकेच्या ताब्यातील सार्वजनिक हौदावर पाणी भरण्यावरून अस्पृश्य आणि ब्राह्मण यांच्यात तंटा उदभवला तेव्हा त्यांनी ब्राह्मण वर्गास इशारा दिला की “विद्येचा जसजसा प्रसार होईल तसतसे शुद्रादी वर्गास हल्लीचे वैषम्य अधिकाधिक टोचू लागेल. ते नाहीसे करण्यास शुद्रादी वर्ग जोराने प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही ब्राह्मण्य रुपी इमारत एकना – एक दिवस नक्की ढासळणार आहे”. सार्वजनिक हौदावर पाणी भरण्याचा आणि स्नान करण्याचा सर्वांना समान अधिकार आहे असे आगरकरांनी सुधारक पत्रात आवर्जून म्हंटले. जन्माधिष्टीत जातीव्यवस्था आणि धर्मव्यवस्थेमुळे समाजाचा विकास खुंटला आहे. प्रत्येक मनुष्य जन्मतः स्वतंत्र आहे ही तात्विक भूमिका आगरकरांची होती. हिंदू धर्मातील जातीव्यस्थेमुळे बहुजन समाज ज्ञानापासून वंचित राहिला त्यामुळे जातीव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या सामाजिक विषमतेचे निर्मूलन करण्यासाठी दलित, भटक्या विमुक्त जमाती, आदिवासी आणि अन्य मागास जमातींना शिक्षण क्षेत्रात जादा संधी मिळाली पाहिजे त्यासाठी आरक्षण असले पाहीजे ही गोष्ट आगरकरांनी आपल्या बुद्धिनिष्ठ आणि विवेकवादी विचारांतून आग्रहाने मांडली.

बुद्धीला पटणारी गोष्ट करणारे आगरकर

देवाचे अस्तित्व नाकारून त्यांनी मूर्तिपूजेला विरोध केला. “धर्माचा सुकाळ आणि बकऱ्याचा काळ” असा लेख लिहून त्यांनी धार्मिक कारणांमुळे होणाऱ्या पशुहत्येवर टिका केली. मृत्यू नंतर होणाऱ्या क्रिया कर्मांवर देखील त्यांचा विश्वास नव्हता. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथात वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते.

स्त्रीवादाचे पुरस्कर्ते

स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल लिहिताना आगरकर म्हणतात की “पुरुषांनी बायका या केवळ प्रजोत्पादनाची हिंडती फिरती यंत्रे आहेत असे समजू नये त्यांच्यात पुरुषांपेक्षा काय कमी आहे? बायकांना बुद्धी, मन, रुची बरे वाईट समजण्याची अक्कल नाही का ? असे प्रश्न आगरकर समाजापुढे उपस्थित करतात आणि सांगतात की स्त्रियांना घरात कोंडून ठेवल्याने समाजाची प्रगती निम्या वेगाने होत आहे म्हणून स्त्रियांना शिक्षण देऊन प्रत्येक शास्त्रात व्यवहारात, कलेत, निष्णात केले पाहिजे . आगरकर एवढ्यावरच थांबत नाहीत ते पुढे म्हणतात की घरकाम करण्यात पुरुषांनी कमी पणा समजू नये, धुणी भांडी, स्वयंपाक दळणवळण ही कामे पुरुषांनी देखील केली पाहिजेत एकंदरीतच आगरकरांनी स्त्री पुरुष समानतेचा विचार त्या काळी मांडलेला होता तो विचार आजही कालसुसंगत आहे.

व्यक्तिस्वातंत्र्याचे समर्थक

आगरकर व्यक्तिस्वातंत्र्याचे खंदे समर्थक होते. पंडिता रमाबाई यांनी जेव्हा ख्रिस्ती धर्म स्वीकारला तेव्हा त्यांना सर्व स्तरातून कडाडून विरोध झाला. आगरकरांनी मात्र ते त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे असे म्हणून पंडिता रमाबाईंच्या कृतीचे समर्थन केले होते. आगरकरांची बायको यशोदाबाई या धार्मिक होत्या. अनिष्ट धार्मिक परंपरांना आगरकरांचा विरोध होता पण त्यांनी कधीही आपले मत आपल्या बायकोवर लादले नाही.

बालविवाहाला विरोध करुन संमती वयाच्या कायद्याची मागणी करणारे आगरकर

त्या काळी बाल विवाहाची प्रथा रूढ होती. मुलींची लग्नासाठी योग्य शारीरिक वाढ झाली नसतानाच, 8 व्या 9 व्या वर्षी मुलींचे विवाह लावून दिले जात. या प्रथेला आळा घालण्यासाठी ब्रिटिशांनी संमती वयाचे विधेयक मांडले. आगरकरांनी या विधेयकाला पाठींबा दिला तर सनातनी लोकांनी, टिळकांनी देखील या विधेयकाला तीव्र विरोध केला. समाजाने बालविवाहाची समस्या स्वतः सोडवावी असे टिळकांचे मत होते तर संमती वयाचा कायदा झाला पाहीजे अशी आगरकरांची भूमिका होती. अखेर संमती वयाचा कायदा पास झाल्यावर आगरकरांचा निषेध करण्यासाठी सनातनी लोकांनी त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली त्यामुळे जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक अशी देखील आगरकरांची ओळख सांगितली जाते.

आगरकरांच्या या पुरोगामी बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेमुळे त्यांना समाजाच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला. यांमुळे आगरकरांना नैराश्य देखील आले पण आगरकर खचले नाहीत. मागासलेला समाज सुधारावा यासाठी आगरकरांची विवेकी लेखणी लिहीत राहिली. आगरकरांनी शेक्सपिअर च्या हॅम्लेट या नाटकाचे विकारविलसित या नावाने मराठीत भाषांतर केले . “फुटके नशीब” हे आत्मवृत्त त्यांनी लिहिले. केसरी आणि सुधारक मधून त्यांनी लिहिलेले अनेक अग्रलेख त्या काळी गाजले. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य आणि सुधारक चे संपादक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत असलेल्या आगरकरांना दम्याचा आजार झाला होता. वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी १७ जून १८९५ रोजी आगरकरांचे पुण्यात निधन झाले. रुढीप्रिय, स्थितीशील समाजाला आगरकरांचे विचार पटले नसले तरी त्यांच्या विचारांनी समाजसुधारणेला गती प्राप्त झाली. समाजविरोधी भूमिकेमुळे टिळकां इतकी लोकप्रियता आगरकरांना लाभली नसली तरी आगरकरांच्या कार्याने पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यासाठी योग्य दिशा मिळाली. अशा या बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारकाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

मयुर डुमने
(लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत)