मुंबई । देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. देशातील ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘महाराष्ट्र के लोग बहादुरीसे सामना करते है’ असे म्हटले. सोबतच कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या २० जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करण्याची सूचना केली. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चष्म्याबद्दलच्या सूचनेचेही पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केले.
पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्य सरकार करीत असलेल्या महत्त्वाच्या उपाययोजनांची माहिती दिली. माझे कुटुंब, माझी जबाबदारी’सारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला आपल्याला दिसेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यात सर्वत्र टेलिआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही ते म्हणाले.
कोविडनंतरदेखील रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रे सुरु करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांनी आपल्या स्तरावरून परत एकदा देशातील नागरिकांना संबोधन करून कोरोनाचा लढा आपल्याला पुढील काळात कसा लढायचा आहे याविषयी मार्गदर्शन करावे. येणाऱ्या काळात सणवार, उत्सव येत असून कोरोना वाढू नये म्हणून आपल्यासमोर आव्हान मोठं आवाहन आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
CM Uddhav Balasaheb Thackeray, today, in a video conference with PM Shri @narendramodi , shared details about the measures taken by the state government to prevent the spread of coronavirus. pic.twitter.com/rkP2OrQWYn
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 23, 2020
राज्यात लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्या घशातून दोन द्राव घेतले जातात. रॅपिड एन्टीजेन चाचणी निगेटिव्ह आली तर दुसरा घेतलेला द्राव आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठविला जातो, औषधांची उपलब्धता ठेवली आहे, दररोज दीड लाखपर्यंत चाचण्या वाढवित आहोत अशी माहिती दिली. राज्यात प्रायोगिक तत्वावर टेलिआयसीयू व्यवस्था सुरु केली असून येणाऱ्या काळात याची उपयुक्तता पाहता सर्व राज्यात ही यंत्रणा उभारून विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात शहरातील तज्ञ डॉक्टर्सचे उपचारांसाठी मार्गदर्शन घेण्याचे आम्ही ठरविले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.