कोल्हापूर | सतिश शिंदे
महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून कोल्हापूर हायवेवर येत्या एक- दोन महिन्यात जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादीत वस्तुंच्या विक्रीसाठी अद्ययावत मॉल (विक्री केंद्र) विकसित केले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केली.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून आजरा येथे विकसित केलेल्या महिला बचत गटांच्या उत्पादीत वस्तुंच्या तालुका विक्री केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, प्रांताधिकारी संपत खिलारी, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, आजऱ्यांच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी तालुका विक्री केंद्रे विकसित करण्याची राज्य शासनाची भुमिका असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात सध्या सात तालुक्याच्या ठिकाणी इमारती पूर्ण असून आजरा आणि गडहिंग्लज तालुका विक्री केंद्रे आज सुरु होत आहे. उर्वरित पाच तालुका विक्री केंद्रे लवकरच सुरु केली जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
महिला बचत गटाची चळवळ अधिक सक्षम करण्यास शासनाचे प्राधान्य राहील, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महिला बचतगटांना व्यवसाय उद्योगासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येत असून बचत गटाच्या महिलांनी शासनाच्या विविध योजनातून आपल्या व्यवसायाची वृध्दी करावी.
महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय उद्योगाद्वारे स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी. बचत गटाद्वारे महिला समर्थ आणि सक्षम बनत असून त्यांना समाजात सन्मान आणि आदराची वागणूक मिळत आहे. बचत गटांच्या उत्पादनांना तालुक्यातील बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी शासकीय यंत्रणांनी व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून लोकसहभागातून या चळवळीला गती द्यावी, असे आवाहन केले.
या प्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, जिल्ह्यात बचत गटाची चळवळ गतिमान झाली असून बचत गटांनी विविध व्यवसाय, उद्योगाद्वारे लोकांना आवश्यक असणारी उत्पादने अधिक दर्जेदारपणे करावी. बचत गटाच्या उत्पादनांना निश्चितपणे बाजारपेठ उपलब्ध करुन देवू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटांना खेळते भांडवल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलाची उभारणी पूर्ण केलेल्या लाभार्थींना धनादेश तर पंडित दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतून प्रशिक्षण घेवून नोकरी मिळालेल्या तरुणांना नोकरीचे पत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते देण्यात आले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या समरनिकेचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी स्वागत केले.