मुंबई, टीम हॅलो महाराष्ट्र : माझ्या बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे, मी मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटलोच नाही, असे स्पष्टीकरण राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली असून विखे पाटील काँग्रेसमध्ये परतणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. सूत्रांच्या मदतीने काहींनी या संबंधी बातम्या देखील दिल्या होत्या. मात्र आता राधाकृष्ण विखे पाटील आणि मल्लिकार्जुन खर्गे या दोघांनीही अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे सांगितले आहे.
खोट्या बातम्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणार
माझ्या बदनामीचे हे षडयंत्र असून खोट्या बातम्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.