वृत्तसंस्था | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील टेक्सासमधील ह्युस्टन येथे २२ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करार होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेने जून महिन्यात भारताचा लाभार्थी देश म्हणून असलेला दर्जा काढून घेतला. लाभार्थी देशांच्या वस्तूंना अमेरिकेमध्ये विशेष सवलत असते. या देशांना अनेक उत्पादनांवरील जकात माफ असते.
अमेरिकेमधील अनेक खासदारांनी काश्मीरमध्ये भारताने लागू केलेले निर्बंध आणि हटवलेले ३७० कलम यावरून टीका केली आहे. मोदींच्या कार्यक्रमाला ट्रम्प उपस्थित राहिले, तर दोन्ही देशांतील संबंध दृढ होण्याचे आणि काश्मीरसह विविध मुद्द्यांवर अमेरिकेचा भारताला पाठिंबा असल्याचे सूतोवाच मिळतील, अशी शक्यता आहे. मोदींच्या या कार्यक्रमाला जवळपास ५० हजार भारतीय अमेरिकी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अमेरिकेमध्ये पुढील वर्षी अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांसमोर येण्याची संधी ट्रम्प सोडणार नसल्याची चर्चा आहे. दोन्ही नेत्यांमधील द्विस्तरावरील चर्चेचे आयोजनही करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यापूर्वी जी-७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर २६ ऑगस्ट रोजी फ्रान्समध्ये भेटले होते.