कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक रणवीर उदाजीराव चव्हाण यांचा मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. अधिवेशनानिमित्त मुंबईत असलेल्या नामदार हसन मुश्रीफ यांनी पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील घटनास्थळासह खालापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन चव्हाण यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच वाशी येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये जाऊन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे फायनान्स मॅनेजर दीपक चव्हाण व कारचालक यांचीही विचारपूस केली. यावेळी गहिवरलेल्या मंत्री मुश्रीफ यांनी साश्रूनयनांनी रणवीर चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली.
मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी बँकेचे व्यवस्थापक असलेले रणवीर चव्हाण हे एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि सच्चे अधिकारी होते. सदैव सकारात्मक वृत्तीने काम करणारे ते एक धडाडीचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे केडीसीसी बँकेने एक प्रामाणिक मोहरा गमावला आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाचा आधारवड तर कोसळलाच आहे, तसेच बँकेचेही अपरिमित नुकसान झाले आहे. मी व्यक्तीशः आणि आमची बँक सदैव चव्हाण कुटुंबियांच्या पाठीशी हिमालयासारखे राहू.