अकोला प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यातील महानगरपालिका, आणि इतर सहा नगरपालिकांमध्ये रमाई घरकुल योजना मागील दोन वर्षापासून रेंगाळत पडली आहे. अकोला जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना ही व्यवस्थित राबविली जात आहे, परंतु रमाई घरकुल योजनेसाठी जिल्हा समाज कल्याण विभागातून निधीच मंजूर केला जात नाही. त्या करीता नगरपालिका आणि महानगरपालिका स्तरावरून प्रस्ताव नसल्याचे तोंडी सांगितले जात आहे. परंतु अनुसूचित जातीकरीता असलेल्या घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यात बेपर्वाई केली जात आहे.
त्यामुळे गेली दोन वर्षे अकोला महापालिका क्षेत्रासोबतच मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूर, बाळापूर, अकोट आणि तेल्हारा ह्या नगर परिषदेत रमाई घरकुल योजना रेंगाळली आहे. गुरुवारी वंचित बहुजन आघाडी अकोल्याच्या वतीने समाज कल्याणच्या सहायक आयुक्त कार्यालयास बेशरमचे तोरण बांधून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी दिलेल्या निवेदनाव्दारे वंचित बहुजन आघाडी आणि वंचित जिल्हा युवक आघाडीच्या वतीने समाजकल्याण विभागला अल्टीमेटम देण्यात आला. येत्या १० सप्टेंबर पर्यंत जिल्हातील रमाई घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून निधी मंजूर करावा अन्यथा समाज कल्याणच्या अनागोंदी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर “लक्षवेधी मोर्चाचे” आयोजन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.