मुंबई प्रतिनिधी | राज्यात अद्याप कुठल्याही राजकीय पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने सत्तेचा पेचप्रसंग निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राज्याच्या अॅटर्नी जनरलला राजभवनात चर्चेसाठी बोलावले आहे. अॅटर्नी जनरलच्या सल्ल्यानंतरच राज्यपाल आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र भाजपने उद्या संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ येत्या 9 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत असून त्याआधीच नवी विधानसभा अस्तित्वात येत आहे. उद्या संध्याकाळपर्यंत सत्तेचा दावा होणं अपेक्षित आहे. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अॅटर्नी जनरल आशुतोष कुंभकोनी यांना सल्लामसलतीसाठी राजभवनावर बोलावले होते. कुंभकोनी राजभवनावर पोहोचले असून राज्यपालांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या चर्चेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलं गेले आहे.
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटले. या शिष्टमंडळाने राज्यपालांशी चर्चा केली. भाजपच्या या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे सत्तेचा दावा केलेला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वाढली आहे.