यवतमाळ प्रतिनिधी। निवडणूका जवळ आल्या की, राजकीय नेते मतांसाठी अनेक आश्वासने देतात. निवडणूका संपल्या की, दिलेल्या आश्वासनांचा विसर पडणे हा काही नेत्यांचा आणि प्रशासनाचा स्वाभाविक गुण असतो. याच गुणांचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुक्यातील पिंपळगावच्या ग्रामस्थांना आला आहे. गेल्या काही वर्षांपासून पिंपळगाव ते सराई हा रास्ता खड्ड्यात शोधायची वेळ आली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थामध्ये तीव्र नाराजी आहे.
या रस्त्यासाठी गावकऱ्यांकडून नेते तसेच प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, कोणतीही दखल न घेतल्या कारणाने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. शिवाय ‘रोड नाही तर वोट नाही’, असा पवित्रा आता पिंपळगाव ग्रामस्थांनी घेतला आहे.
पिंपळगाव ते सराई येथे ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या वाईट अवस्थेमुळे शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना पावसाळ्यामध्ये चिखल तुडवत शेतात जावे लागत आहे. गावात सोबतच शेतात कामगिरीसाठी उपयोगी अशी वाहने खराब रस्त्यामुळे शेतापर्यत नेता येत नाही. त्यामुळे शेती पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीपूर्वी डांबरी रस्ता झाला नाही तर एकाही नेत्याला गावात पाय ठेऊ देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. तेव्हा आता ग्रामस्थांच्या निवडणूक बहिष्काराच्या इशाऱ्याची दाखल कितपत घेते हे पाहणे ओसुक्याचे ठरणार आहे.