सांगली प्रतिनिधी। आटपाडी तालुक्यातील हिवतड येथे लांडग्यांच्या हल्ल्यात ३८ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. शेतात बसवलेल्या मेंढ्यांवर मध्यरात्री लांडग्यांच्या कळपाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ३८ लहान मोठ्या मेंढ्या ठार झाल्या. हा घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील सतीश शेळके, युवराज मांडले, संभाजी हराळे, हरिबा कोळेकर यांच्या मेंढ्यांचे कळप हिवतड येथील एका शेतकऱ्याच्या शेतात बसले होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लांडयांनी मेंढ्याच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात ६ लहान, ३२ मोठ्या अशा ३८ शेळ्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत.
या हल्ल्यामुळे मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मेंढपाळांनी शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान लांडग्याने हल्ला केल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, तहसीलदार सचिन लांगुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुप्रिया शिरगावे, यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मोठ्या प्रमाणात मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.