बुलडाणा प्रतिनिधी | बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालय रिक्त पदांसह अनेक समस्यांनी ग्रासले आहे. वरवट बकाल हे गाव आदिवासी बहुल भागातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने आसपासच्या परिसरातील अनेक रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. येथील समस्या निकाली लावण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने व ग्रामस्थांनी १५ ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे.
वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात मंजूर २७ पदांपैकी १२ पदे रिक्त असून, मागील अनेक वर्षांपासून येथे वैद्यकीय अधिकारी नाही. रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून परिसरात गवत वाढल्याने साप, विंचू आदींपासून धोका निर्माण झाला आहे. तसेच रुग्ण कल्याण समितीची बैठकही नियमित होत नाही. एक्सरे मशीन धूळखात पडली आहे. रुग्णालयाला २०१५ पासून मिळालेला लाखो रुपयांचा निधी पडून आहे..या सर्व गोष्टींची दखल घेण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला केली आहे.
या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ, रिपाई गटाचे तालुकाध्यक्ष बाबूलाल इंगळे, रयत क्रांती सेनेचे तालुकाध्यक्ष नाना पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजपा वगळता सर्व पक्ष व संघटनानी या आमरण उपोषण आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाहीत. तोपर्यंत उपोषण सुरुच राहिल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.