मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं एक व्यंगचित्र शेअर केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मांना मारहाण केली होती. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. आज मदन शर्मांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हटवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याचं म्हणत शिवसैनिकांनी मला मारहाण केली होती. आता मी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आहे, असं शर्मांनी राज्यपालांनी सांगितलं.
माझ्यावर जीवेघणा हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर गंभीर गुन्हे दाखल केले गेले नाहीत, अशी व्यथा शर्मांनी राज्यपालांकडे मांडली. यानंतर राज्यपालांनी कठोर कारवाईचं आश्वासन दिल्याचं शर्मांनी सांगितलं. राज्यातलं सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी राज्यपालांकडे केली. यावर केंद्राशी बोलेन, असं उत्तर राज्यपालांनी दिल्याचं शर्मा म्हणाले.
‘मी भाजप-संघाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी मला मारहाण केली. त्यामुळे आता मी भाजप-संघासोबत असल्याची घोषणा करतो’, असं मदन शर्मांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. शर्मांनी याआधीही ठाकरे सरकारवर थेट निशाणा साधला होता. कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल तर ठाकरेंनी त्वरित त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, असं शर्मांनी म्हटलं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.