कोल्हापूर प्रतिनिधी, सतेज औंधकर : समाजातील शोषित, पीडित, उपेक्षित घटकांना उभं करण्यासाठी सत्तेचा वापर करून रयतेसाठी राज्य करणारा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा गौरव केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज कोल्हापूरमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. गेल्या ५० वर्षांत कोल्हापूर असो व अन्य कुठेही, शाहू महाराजांसंबंधी कुठलाही सोहळा असला तरी माझी उपस्थिती चुकलेली नाही, असे पवारांनी सुरवातीलाच नमूद केले.
समाजाला दिशा देणारे नेतृत्व
पवार या प्रसंगी बोलताना म्हणाले, आपल्या हातात असलेलं राज्य हे रयतेसाठी कसं वापरायचं, आणि ही सत्ता आपली नव्हे तर समाजातील शोषित, पीडित, उपेक्षित घटकांना उभं करण्यासाठी कशी वापरायची, हे सूत्र घेऊन रयतेसाठी राज्य करणारा या देशाचा राजा कोणता असा प्रश्न विचारला तर एकच उत्तर येतं ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज. आरक्षणासंबंधी आजही आपल्यासमोर आव्हानं असताना त्याकाळी शाहू महाराजांनी ५० टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला आणि राबवला. कारण अख्खी पिढी शिक्षित झाली पाहिजे असा विचार त्यामागे होता. समाजाला दिशा देणारं त्यांचं नेतृत्व होतं.
या प्रसंगी बोलताना पवारांनी संसदेच्या प्रांगणात असणाऱ्या राजर्षी शाहू महराजांच्या पुतळ्याचा आवर्जून उल्लेख केला. त्यांनी म्हंटले की, महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांनी मिळून आम्ही लोकसभेचे अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती यांच्याकडे संसदेच्या प्रांगणात छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बसवण्याकरिता पुढाकार घेतला. आज संसदेमध्ये जाताना शाहू महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊनच जाता येतं.
या कार्यक्रमास पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार पी.एन.पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.